दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज व महिला-मुलींशी कथित गैरवर्तनप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

Mon 27-Jul-2026,09:58 PM IST -07:00
Beach Activities

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज व महिला-मुलींशी कथित गैरवर्तनप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा : दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात विविध न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित लाठीचार्ज तसेच महिला व मुलींशी झालेल्या कथित गैरवर्तनाच्या घटनेचा वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

या गंभीर प्रकरणी वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष सौ. अरुणा प्रभाकरराव धोटे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांची भेट घेऊन निवेदन साद केले. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला असताना, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही गंभीर व निषेधार्ह बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच महिला व मुलींशी झालेल्या कथित गैरवर्तनाच्या घटनेची सखोल चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून देणे आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली.

खासदार अमर काळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत, हा मुद्दा आगामी संसद अधिवेशनात ठामपणे उपस्थित करून विद्यार्थी व पीडितांच्या न्यायासाठी संसदेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले.

निवेदनाद्वारे सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :

पीडित कुटुंबांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने विद्यार्थ्यांची माफी मागावी.

संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी लक्ष्मी लिचडे, प्रतिभा बोरघरे, जया चांदेकर, इंदिरा कोवे यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.